ऑपरेशन शक्ती: 24 वर्षांपूर्वी भारताने जगाला केले होते चकित, पोखरणमध्ये केल्या पाच अणुचाचण्या


नवी दिल्ली – आजच्याच दिवशी 24 वर्षांपूर्वी तत्कालीन अटल सरकारने राजस्थानमधील पोखरणमध्ये सातत्याने अणुस्फोट घडवून संपूर्ण जगाला हादरवले होते. ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत घेण्यात आलेल्या या चाचण्यांमधून भारताने अटूट इरादे दाखवून बलशाली भारताला अधिक उंची दिली होती. 11 मे आणि 13 मे 1998 रोजी एनडीएच्या नेतृत्वाखालील अटलबिहारी वाजपेयी सरकारने खेतोलाई गावातील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर पाच अणुचाचण्या केल्या होत्या.

अटल सरकारने पोखरण-2 चाचणीची संपूर्ण रणनीती एवढी गुप्त ठेवली की अमेरिका आणि त्यांच्या उपग्रहांना देखील याची माहिती पडू दिली नाही. भारत एवढे मोठे पाऊल उचलत असल्याचे कुणालाही खबर लागू दिली नाही. मात्र, याचा निषेध म्हणून अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी भारतावर कडक निर्बंध लादले. केवळ इस्रायलने भारताला पाठिंबा दिला होता.

यशस्वी अणुचाचणीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, आज भारताने पोखरणमध्ये भूमिगत चाचणी केली. अटलजी स्वतः तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत चाचणीच्या ठिकाणी गेले होते. या चाचणीने भारताची छाती रुंद झाली आणि भारत अणुशक्ती देश बनला. तेव्हा अटलजींनी ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’, अशी घोषणा दिली. तेव्हापासून दरवर्षी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारत हा जगात अणुक्रांतीत कायमच अग्रेसर राहिला आहे. डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी खूप पूर्वी जागृत केले होते, परंतु त्यांची स्वप्ने षड्यंत्रांमुळे पूर्ण झाली नाही. यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 18 मे 1974 रोजी पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी करून भारताचे नाव जगातील अण्वस्त्र सक्षम देशांच्या यादीत नोंदवले. पोखरण-1 ला ‘बुद्ध स्मायलिंग’ (बुद्ध हसत आहे) असे नाव ठेवण्यात आले होते. यानंतर, 1995 मध्ये भारताने आणखी चाचण्या केल्या, परंतु जागतिक समुदायाच्या कठोर वृत्तीमुळे त्या होऊ शकल्या नाहीत.

तत्कालीन संरक्षण शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन आणि 2002 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 1998 च्या अणुचाचणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.