ईडीच्या रडारवर आलेल्या जॅकलिनने मागितली परदेशात जाण्याची परवानगी


मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस कायम चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणातही जॅकलिनची चौकशी सुरू आहे. अलीकडेच, ईडीने जॅकलिनची 7.27 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने आज दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल करत परदेशात जाण्यासाठी तिने परवानगी मागितली आहे.

जॅकलिनने तिच्या अर्जात म्हटले आहे की, तिला 15 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर लगेच जायचे आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या आयफा वीकेंड अवॉर्ड्ससाठी तिला अबुधाबीला जायचे असल्याचे जॅकलिनने नमूद केले आहे. एवढेच नाही तर काही चित्रपटांच्या शूटिंगच्या निमित्ताने फ्रान्स आणि नेपाळला जाण्याची परवानगीही तिने न्यायालयाकडे मागितली आहे. जॅकलिनच्या अर्जावर 18 मे रोजी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे.

जॅकलिनच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे, त्यामुळे ती परदेशात जाऊ शकत नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परदेश दौऱ्यावर जात असताना मुंबई विमानतळावर तिला ताब्यात घेण्यात आले होते. पण, चौकशीनंतर जॅकलिनला सोडून देण्यात आले. यानंतर ती देश सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.

अभिनेत्रीचे सुकेश चंद्रशेखरसोबत संबंध असल्याच्या वृत्तानंतर अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिन फर्नांडिसवर बारीक नजर ठेवली आहे. सुकेश जॅकलीन आणि तिच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तू द्यायचा, असा आरोपही करण्यात आला होता. खंडणी प्रकरणात जॅकलिनची 7.27 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी जॅकलिनशिवाय नोरा फतेहीसह इतर अभिनेत्रींचीही चौकशी सुरू आहे.