आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकले ‘असनी’ चक्रीवादळ, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये हाय अलर्ट


नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता दिसू लागला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही तासांत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल.

असनी चक्रीवादळामुळे विशेषतः ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिहिर कुमार पांडा, अतिरिक्त एसपी, पुरी, ओडिशा म्हणाले, असानीमुळे जोरदार वारे वाहत आहेत आणि उंच लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ते म्हणाले की, पोलीस दल आणि सर्व ठाण्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

सायंकाळपर्यंत दिसून येईल चक्रीवादळाचा अधिक प्रभाव
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, असनी चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेला सरकेल आणि येत्या काही तासांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचेल. त्यानंतर हे चक्रीवादळ मछलीपट्टणम, नरसापूर, यानम, काकीनाडा, तुनी आणि विशाखापट्टणम किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त प्रदीत कुमार जेना यांनी सांगितले की, विशाखापट्टणमला पोहोचल्यानंतर ते समुद्रात मिसळेल. IMD नुसार, चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि पुढील काही तासांपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.

उद्यापासून कमजोर होईल वादळ
हवामान तज्ज्ञांच्या मते, 12 मेच्या सकाळपर्यंत चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर आलेले ‘असनी’ हे तीव्र चक्रीवादळ गेल्या 6 तासात 12 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले, हळूहळू चक्रीवादळ कमकुवत होईल. बुधवारी सकाळी असनी काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यानच्या किनाऱ्यावर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान ताशी 100 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात आणि मुसळधार पाऊस पडू शकतो.

काकीनाडा येथे चक्रीवादळामुळे रस्त्याचे नुकसान
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जोरदार वाऱ्यासह समुद्रातील हालचाली वाढल्या आहेत. येथील थिम्मापुरम पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता खराब झाला आहे. दोन चेकपोस्ट टाकून या दिशेने जाणारी वाहतूक रोखत आहोत. आम्ही पूर्ण सतर्क आहोत. माईकवर लोकांना बाहेर न येण्याची विनंती केली आहे, त्याचबरोबर मच्छीमारीला देखील परवानगी देण्यात आलेली नाही.

इंडिगोने रद्द केली सर्व उड्डाणे
असनी चक्रीवादळामुळे इंडिगोने आता सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक श्रीनिवास राव यांनी सांगितले की, सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याच वेळी, एअर एशियाने बेंगळुरू आणि दिल्लीची उड्डाणेही रद्द केली आहेत. त्याचवेळी एअर इंडियाने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

पुरीत ताशी ३० किमी वेगाने वारे वाहत आहेत
पुरी हवामान केंद्राचे प्रभारी हृषिकेश पांडा यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर वाईट स्थिती कायम आहे. दरम्यान, सकाळी 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. ते म्हणाले की, पुरी जिल्ह्यात काल रात्रीपासून 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.