उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचे उत्तर


सांगली – मशिदींवरील भोंग्यांच्यासत्ता येत-जात असतात. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही. राज्य सरकार मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केल्यावर बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तरी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देणारे पत्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पण या पत्रासंदर्भात बोलताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांनी त्यावर उत्तर देताना, सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेले नाही, हे जगातील प्रत्येकाला माहिती आहे. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी बोलून दाखवतो, मी कालच एका सभेमध्ये बोलून दाखवले असल्याचे म्हटले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात काम करायचे म्हटले तर कायद्याने, घटनेनेमध्ये लोकशाहीमध्ये 145 जी व्यक्ती स्वत:च्या पाठीशी उभी करु शकते, ती व्यक्ती मुख्यमंत्री होते आणि हे त्रिवार सत्य आहे. त्यामध्ये कोणीही काही सांगितले, अमक्याने व्हावे, तमक्याने व्हावे, असा सांगायचा किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याला कोणी नाकारणार नाही. पण कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेले आहे. अशापद्धतीने काम करताना काही अल्टीमेटम देतात हे देखील बरोबर नसल्याचेही अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याच्या कारभार चालला आहे. त्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापुर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचे नेतृत्व केलेले आहे, आपण हे गेल्या अनेक वर्ष पाहत आहोत. हे पाहत असताना त्यामध्ये कोणीही राज्यकर्ते असले, तरी त्यांना कायद्याच्याबाहेर, संविधानाच्या बाहेर, घटनेच्याबाहेर जाऊ शकत नाही. तसेच कोणी जाऊ इच्छितही नाही. त्यामुळे अल्टीमेटम ही हुकूमशाहीची भाषा असून आपल्याकडे लोकशाही असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

तुमची मत मांडण्याचे तुम्हाला अधिकार आहेत, पण मत मांडताना दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होणार असेल. माझ्या वक्तव्यांमुळे समाजात दुही माजणार असेल, तर माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलीस खात्याला आहे. पोलीस खात्याला सांगण्यात आलेले आहे की कशापद्धतीने काय वागले पाहिजे, कसे केले पाहिजे. जेव्हा येथे कार्यक्रम घेतला, तेव्हा काय काय सुरक्षा बाळगायची हे सांगितले जाते. पोलिसांनी हे प्रतिक पाटील यांच्या कार्यक्रमालाही सांगितले असणार आणि आयोजक म्हणून त्यांनी हे केले पाहिजे. जसे हे आहे तसेच परवानगी देताना काही नियम ठरवलेले असतात आणि त्याचे पालन करायचे असते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.