जातीयवादावर शरद पोंक्षे यांचे भाष्य, ब्राह्मण समाजाला केले हे आवाहन


पुणे – अभिनेते शरद पोंक्षे मराठी हे चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे म्हणून ओळखले जाताता. त्यांनी कायमच अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अनेकदा विविध राजकीय गोष्टींवर मत मांडताना अभिनेते शरद पोंक्षे दिसतात. नुकतेच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे शरद पोंक्षे हे चर्चेत आहे. पण गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक आहे, अशी टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी हे नाटक करणे थांबवले आहे. पण ते त्यांचे विचार अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रातून मांडताना दिसतात. नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी जातीयवादावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

राज्यातील वातावरण अनेक जातीयवाद्यांनी गढूळ केले आहे. ब्राह्मणांनीच ते स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजसुधारणा फुले, शाहू, आंबेडकरांनीही केली आहे. ब्राह्मणांचाही त्यात मोठा वाटा होता. पण, ब्राह्मणांनी जात संपविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी यावेळी केले.

गेले १५ वर्षे मी जात संपविण्यासाठी व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा गर्व नाही. जात ही संपलीच पाहिजे. त्यापेक्षा मनुष्य धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे, पण त्यासाठी प्रयत्न करु नये, असे म्हणून चालणार नाही. कारण जात संपवण्यात कधीतरी यश मिळेल आणि आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, असेही शरद पोंक्षे म्हणाले.

जाती जातींमध्ये सध्या फार मोठी तेढ निर्माण झाली आहे. मराठा, कुंभार, ब्राह्मण असे विविध जातींचे संघ निर्माण झाले आहेत. हे सर्व संपवायला हवेत, फक्त एकच हिंदू जात राहायला हवी. मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुरु केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत, तेवढेच मला बाबासाहेब आंबेडकर देखील प्रिय असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितले.