जालना – कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सध्या वाढ होत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. पण अशा परिस्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका कायम आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोनाची चौथी लाट जून, जुलैमध्ये येऊ शकते, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यातच राज्यासमोर लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, हेच आव्हान असल्याचेही राजेश टोपे म्हणाले आहेत. राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर लसीकरण करण्याचे आवाहन जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य
जून, जुलैमध्ये येणारी कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचे वाटले, तर तिला लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवणे महाराष्ट्रासमोर महत्वाचे काम असणार आहे. याबाबतीत आरोग्य विभाग अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचे काम करत असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेल्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील बाधितांची संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून निश्चितच वाढत आहे. याआधी शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या 50 च्याही खाली होती. नंतर ही बाधितांची संख्या साधारण 50 च्या घरात आली; परंतु तिसऱ्या आठवडय़ापासून बाधितांच्या संख्येत सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ पुढे कायम राहिली आहे. परिणामी, आता दैनंदिन बाधितांची संख्या 100 च्याही पुढे गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. तसेच मृत्यूही जवळपास शून्य आहेत. तेव्हा सर्वेक्षणावर सध्या अधिक भर दिला जात आहे.