ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची केली दिशाभूल – नाना पटोले


मुंबई – आज सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश दिल्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी भाजपच असल्याचे स्पष्ट झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले या संदर्भात बोलताना म्हणाले की, भाजप आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आरक्षणविरोधी असून ओबीसींना मंडल आयोगाने आरक्षण दिले होते. त्यावेळी त्याला विरोध करत भाजपने कमंडल यात्रा काढली होती. इम्पिरीकल डेटा केंद्रातील भाजप सरकारने न दिल्यामुळेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारने डेटा दिला नसल्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. याला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांनी बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण वाचविण्यासाठी पाच वर्ष सत्तेत असताना देखील काहीही केले नाही. भाजपला फक्त ओबीसी समाजाची मते हवी आहेत. ओबीसींनी आरक्षण किंवा शासकीय योजनांचा लाभ द्यायचा नाही. भाजपला खरेच ओबीसी आरक्षण द्यायचे असेल, तर केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत बहाल करावे, असे पटोले म्हणाले.