संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन


मुंबई – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संतूर या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज 10 मे रोजी निधन झाले आहे. आज सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.

पं. शिवकुमार शर्मा यांचे भारतीय अभिजात संगीतात योगदान अतुलनीय होते. काश्मीरमधील संतूर या लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर ‘सिलसिला’ या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

त्यांची ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी त्यामध्ये वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ‘शिव-हरी’ या नावाने ही जोडी ओळखली जात असे. अनेक चित्रपटांना या जोडीने संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (1980) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (1985), ‘चांदणी’ (1989), ‘लम्हे’ (1991), ‘डर’ (1993) या चित्रपटांना संगीत दिले आहे.