योगी आदित्यनाथ अयोध्येत बांधणार लता मंगेशकर यांच्या नावाने चौक


लखनौ – अयोध्येत भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ चौक बांधण्यात येणार असून अयोध्या प्रशासनाला यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील 15 दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, असे म्हटले आहे. त्याचबरोब लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावीत.

अयोध्या महानगरपालिकेने हे निर्देश येताच शहरातील प्रमुख ठिकाणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील अयोध्येतील मुख्य चौकांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या 10 दिवसांत एक जागा निश्चित करण्यात येईल, असे अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय म्हणाले आहेत.