मुंबई – लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे फोटो समोर आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सोमवारी लीलावती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी चांगलेच फैलावर घेतले. शिवसेना नेत्यांनी यावेळी नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटो कोणी काढला असा सवाल उपस्थित केला. याबबात पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. त्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या नवनीत राणा यांनी याबाबत भाष्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश दिले तर नवल वाटणार नाही – नवनीत राणा
सत्ता असल्याने मुख्यमंत्री गैरवापर करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करु शकतात. लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही. कारण रुग्णालयापर्यंत त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण पोहोचले असल्याचे नवनीत राणा टिव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या आहेत.
लीलावतीमध्ये मी एमआरआय केला आहे. दोन वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? त्यांनी आधी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग माझ्याकडे रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यासह देईन. कोणाच्या खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नसल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना नेते धडकले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली होती. खरच नवनीत राणा यांचा एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना फोटो कसे काढले गेले? रुग्णालयाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत, असे म्हणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.