कोल्हापुरातील या गावाने विधवांसाठी घेतला पुढाकार : नवऱ्याच्या मृत्यूनंतर ना फोडाव्या लागणार बांगड्या, ना पुसावे लागणार कुंकू


पुणे : राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावाने आदर्श निर्णय घेतला आहे. गावात राहणाऱ्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, तर पतीच्या अंत्यसंस्कारानंतर पाळल्या जाणाऱ्या प्रथांवर बंदी घालण्यात आल्या आहेत. पतीच्या निधनानंतर महिलांना आता बांगड्या फोडण्यासोबतच, कपाळावरील कुंकू पुसण्यास आणि त्या महिलेचे मंगळसूत्र काढण्यास मनाई केली आहे. त्याचा ठराव 4 मे रोजी मंजूर करण्यात आला. या निर्णयाला गावातील लोकांकडूनही पाठिंबा देण्यात आला गेला आहे. हे गाव शिरोळ तालुक्यातील हेरवाडमध्ये येते, या ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील असून पाटील म्हणाले की, सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद जिंजाडे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांना या प्रथेतून जावे लागते, ही अत्यंत मानहानीकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

एक उदाहरण बनले हे गाव
पाटील म्हणाले, आम्हाला या प्रस्तावाचा अभिमान वाटतो, कारण या प्रस्तावाने हेरवाड हे इतर ग्रामपंचायतींसाठी एक उदाहरण म्हणून समोर उभे राहणार आहे, विशेषत: महिलांच्या उद्धारासाठी कार्य करणारे समाजसुधारक राजर्षी छत्रपती साहू महाराज यांच्या 100 वी पुण्यतिथी वर्ष साजरे करत आहे.

सरपंच म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आमच्या एका सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या पत्नीला बांगड्या फोडायला, मंगळसूत्र काढायला आणि कुंकू पुसायला कसे भाग पाडले गेले, ते मी पाहिले. त्यामुळे महिलेच्या दु:खात आणखीनच भर पडली. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

जिंजाडे म्हणाले की, अशी प्रथा बंद करण्याचा निर्णय घेताना, त्यांनी गावातील पुढारी आणि पंचायतींशी संपर्क साधून त्यावर पोस्ट लिहिली आणि अनेक विधवांचा चांगला प्रतिसाद पाहून आनंद झाला. ते म्हणाले, माझ्यातर्फे उदाहरण म्हणून यासाठी मी स्टॅम्प पेपरवर जाहीर केले की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला या प्रथेची सक्ती करू नये. माझ्या घोषणेला दोन डझनहून अधिक लोकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर हेरवाड ग्रामपंचायतीने माझ्याशी संपर्क साधला आणि त्याबाबत ठराव करणार असल्याचे सांगितले.

हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील म्हणाले, कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांच्या कल्याणासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. त्यांच्या प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. आता, आम्हाला वाटते की विधवांसाठी असलेली ही प्रथा आता बहिष्कृत करण्याची वेळ आली आहे. तरुण स्त्रियांना तुरुंगातील कैद्यांप्रमाणे जीवन जगण्यास भाग पाडणे किंवा अपवित्र किंवा दुर्दैव आणणारे असे काही तरी करण्यास भाग पाडणे आम्हाला योग्य वाटले नाही.

विधानसभेत कायदा करण्याची मागणी
महिला बचत गटात काम करणाऱ्या अंजली पैलवान (35) सांगतात की, विधवा असूनही त्या दागिने घालून समाजात मोकळेपणाने फिरतात. विधवा प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना विधवांच्या स्वाक्षरीसह दिले असल्याचे ते म्हणाले.