पुढील महिन्यात उड्डाण सुरू होऊ शकते जेट एअरवेजची सेवा, सुरक्षा मंजुरीनंतर मार्ग मोकळा


जेट एअरवेजची विमाने पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाली आहे आणि योजनेनुसार, विमान कंपनी पुढील महिन्यात आपली सेवा पुन्हा सुरू करेल. गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की एअरलाइनला गेल्या आठवड्यात सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे आता कंपनी पुन्हा सेवा सुरू करू शकते.

तीन वर्षांनी सुरु होणार सेवा
5 मे रोजी जेट एअरवेजने हैदराबाद ते दिल्ली चाचणी उड्डाण केले होते. ही फ्लाइट पूर्ण तीन वर्षांनी सुरु झाली होती, कारण 2019 मध्ये कंपनीच्या दिवाळखोरीमुळे सेवा बंद झाल्या होत्या. अधिकृत कागदपत्रांनुसार, जेट एअरवेजचा सध्याचा प्रवर्तक जालान-कोलरॉक कंसोर्टियम आहे. आधी त्याचे मालक नरेश गोयल होते. 17 एप्रिल 2019 रोजी जेट एअरवेजच्या विमानाने शेवटचे उड्डाण केले.

मुरारी लाल जालान आणि कॅलरॉक कंसोर्टियमने जून 2021 मध्‍ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्‍या देखरेखीखाली दिवाळखोरी आणि रिझोल्यूशन प्रक्रियेत जेट एअरवेजची बोली जिंकली होती. आता त्याला सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे, कंपनीच्या सेवा नवीन मालकासह पुन्हा सुरू होणार आहेत. म्हणजेच पुढील महिन्यापासून या एअरलाइन्सच्या विमानांमध्ये प्रवासी प्रवास करू शकतील.