जाणून घ्या कोण आहे नेपाळचे कामी रीता, ज्यांनी 26व्यांदा एव्हरेस्ट सर करुन रचला इतिहास


काठमांडू : माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. एके दिवशी त्यावर चढाई करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण कोणी किती वेळा चढेल? एकदा, दोनदा पण नेपाळच्या एका शेर्पाने 26व्यांदा एव्हरेस्ट सर करुन आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. 52 वर्षीय कामी रीता शेर्पा यांनी इतर 10 गिर्यारोहकांसह साउथईस्ट रिजमधून 8,848.86 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले.

काठमांडू येथील पर्यटन विभागाचे महासंचालक तारानाथ अधिकारी यांनी सांगितले की, कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा स्वतःचा विक्रम मोडत नवा विश्वविक्रम रचला आहे. कामी शेर्पा यांची पत्नी लक्पा जंगमू म्हणाली की, ती तिच्या पतीच्या कामगिरीने खूप आनंदी आहे. कामी रीता या पर्वतावर चढण्यासाठी वापरलेला मार्ग 1953 मध्ये एव्हरेस्ट गिर्यारोहक एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी विकसित केला होता आणि तो आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध मार्ग आहे.

316 जणांना मिळाली एव्हरेस्ट चढण्याची परवानगी
नेपाळने यावर्षी 316 लोकांना एव्हरेस्ट चढण्यासाठी परवाने दिले आहेत. गेल्या वर्षी 408 जणांना परवाने देण्यात आले होते. 2019 मध्ये अनेक गिर्यारोहकांच्या मृत्यूमुळे आणि एव्हरेस्टवर चढण्यासाठी अधिक लोकांना परवानग्या दिल्यामुळे नेपाळवर सातत्याने टीका होत आहे. 1953 पासून आतापर्यंत 10,657 वेळा एव्हरेस्टवर चढाई झाली आहे. अनेकांनी अनेक वेळा चढाई केली आहे, तर पर्वत चढण्याच्या प्रयत्नात 311 जणांना जीव गमवावा लागला आहे.

कोण आहे कामी रिता शेर्पा
कामी रीता यांचा जन्म 17 जानेवारी 1970 रोजी झाला होता. त्यांचा जन्म डोंगराळ भागात असलेल्या सोलुखुंबू गावात झाला. एकाच खोलीच्या घरात ते कुटुंबासह राहत होते. याच गावात तेनसिंग नोर्गे यांचे घर होते, ज्यांनी एडमंड हिलरीसोबत पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला होता. तारुण्यात, कामीला बौद्ध भिक्खू बनायचे होते आणि त्यांनी काही काळ एका मठात घालवला पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला. कामीने पहिल्यांदा 1992 मध्ये एव्हरेस्टवरील बेस कॅम्पवर स्वयंपाकी म्हणून काम सुरू केले. एका रिपोर्टनुसार, वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सामान पोहोचवायला सुरुवात केली. नंतर 1994 मध्ये, वयाच्या 24 व्या वर्षी, त्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली आणि तेव्हापासून जवळजवळ दरवर्षी ते जगातील सर्वोच्च शिखर चढत आहेत. 2019 मध्ये, ते एका साहसी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर देखील होते.

कामीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते काठमांडूमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलांनी वाचन आणि लिहावे आणि एक चांगले करिअर निवडावे, जे पर्वतांवर मार्गदर्शक होण्यापेक्षा कमी धोकादायक आहे. आपल्या विक्रमाबद्दल ते म्हणाले की, अनेक लोक विक्रम मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही विक्रम करण्यासाठी हे करत नाही. मला वाटते की नेपाळमध्ये पर्यटन कसे वाढवता येईल. आम्ही इतर गिर्यारोहकांना येथे कसे आमंत्रित करू शकतो?, यावर लक्ष केंद्रित करत आहोत.