रेशन कार्डधारक इकडे लक्ष द्या : केंद्र सरकारने कमी केला कोटा, जाणून घ्या जूनपासून किती मिळणार गहू आणि तांदूळ


नवी दिल्ली – केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत उत्तराखंडचा गव्हाचा कोटा सप्टेंबरपर्यंत कमी केला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राथमिक कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना आता पुढील महिन्यापासून कमी गहू आणि अधिक तांदूळ मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदूळातून केली जाईल.

काही राज्यांना मोफत वितरणाअंतर्गत गहू मिळणार नाही. तर उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसाठी कोटा कमी करण्यात आला आहे. याचे कारण गव्हाची कमी खरेदी असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांकडून कमी गहू खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या राज्यांमध्ये खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातही उत्पादनात घट झाली आहे.