रामदास आठवले यांनी व्यक्त केली आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा


संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 2014 साली भाजपकडून रामदास आठवले यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले हे सध्या सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला रामदास आठवले यांनी सहकुटुंब भेट दिली. ते संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळीच त्यांनी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीमधून लोकसभा निवडणूक रामदास आठवले यांना लढवायची असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे.

रामदास आठवले हे २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली शिर्डीमधून रामदास आठवले यांनी लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता. शिर्डी हा मतदार संघ त्यावेळी आघाडीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक मतदार संघ मानला जात होता. त्यामुळे शिर्डीसारख्या सुरक्षित मतदार संघात झालेला पराभव तेव्हा रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडले होते.

रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी तत्कालीन कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना जबाबदार धरले होते. मला आपल्याच नेत्यांनी शिर्डीमध्ये पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता भाजपसोबत रामदास आठवले आहेत आणि २००९ साली रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी ज्यांना जबाबदार धरले होते ते राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा आता भाजपमध्ये आहेत. रामदास आठवले यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात आता मला शिर्डीत मदत कराल ना ? असा गमतीने प्रश्न विचारला होता. आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात रामदास आठवले आहेत. पण राधाकृष्ण विखे पाटील यावेळी त्यांना मदत करतील का? यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी शिवसेनेसोबतच्या संबंधाबतही भाष्य केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवुन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.