मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घाबरले असल्यामुळे त्यांच्यावर 1 मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांनी सभा घेऊन लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी त्यांनी 3 मेचा अल्टिमेटम दिला होता. जर मशिदींवरील लाऊडस्पीकरवर राज्य सरकारने कारवाई केली नाही, तर आमचे मनसैनिक त्या मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवतील, असा इशारा देखील दिली होता. आता या वादात काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी उडी घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज ठाकरेंना घाबरले आहे महाविकास आघाडी सरकार – संजय निरुपम
या संदर्भात द प्रिंन्टने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे सांगत सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंवर कारवाई न झाल्याबद्दल संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद येथील सभेसाठी महाराष्ट्र पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे राज ठाकरेंनी उल्लंघन केले आहे. दोन न्यायालयांचे राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट आहेत. पण मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत? हेच मला समजत नाही. राज ठाकरेंची भीती सरकारला वाटत आहे, असे संजय निरुपम म्हणाले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कायद्याचे राज्य देशात आणि महाराष्ट्रात आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले.
उत्तर भारतीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी – संजय निरुपम
मी भाजप खासदाराचे वक्तव्य ऐकले आहे. अयोध्येत राज ठाकरेंना घुसू देणार नाही, त्यांच्या या मताशी मी सहमत नाही. सर्वांना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. पण राज ठाकरे अयोध्येला जात आहेत म्हणजे ते हिंदुत्वाच्या परंपरेचा स्विकार करत आहेत आणि उत्तर भारतात जात आहेत. पण त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, असे संजय निरुपम म्हणाले.