हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली घडवण्याचा डाव – संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा


मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पोलिसांच्या भीतीने राज्यातीलत सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला. तसेच त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोपही शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, राज्यातील सर्व राजकीय भोंगे पोलिसांच्या भीतीने गायब झाले आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत, त्यानुसार या राज्यात काम होईल. महाराष्ट्रात शांतता आहे. कोणत्याही समाजात कुठेही भांडण नाही, सर्व ठीक आहे. पण लोकांना ही शांतता बघवत नसल्यामुळे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू मुस्लीम यांच्यात भोंग्यावरून तणाव तसंच दंगली घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी त्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

महाराष्ट्रातील हिंदू मंदिरांना बसला लाऊड स्पीकरवरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका
देशात लाऊड स्पीकरबाबत नक्कीच एक धोरण असायला हवे, असे आम्ही आधीही म्हटले आहे. मला वाटते आता केंद्र सरकारला हे धोरण निश्चित करावे लागेल. याबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील केली आहे. याप्रमाणे देशासाठी धोरण करून देशाला लागू करा. यात जात-धर्माचा प्रश्न येत नाही. पण, ज्यांनी मशिदीवरील लाऊड स्पीकरचा विषय काढला, त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील हिंदू मंदिरांना बसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच याचा फटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. त्यामुळे या भूमिकेवर महाराष्ट्रात सर्वात जास्त हिंदू समाज नाराज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असे काही होऊ शकले नाही. या राज्याची जनता सुज्ञन आहे.

लाऊड स्पीकरवर बोलण्याऐवजी महागाईवर बोला
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिंता आहे. ते त्यासाठी मध्यस्थी करत आहेत. त्यांचे भक्त त्यांची त्यासाठी वाहवाही करत आहेत. पण, या देशातील जनता महागाईशी सामना करत आहे. तर भाजपचा एकही नेता, मंत्री पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात बोलत नाही. लाऊड स्पीकरबाबत कसले बोलत आहात, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणे सरकारचे कर्तव्य आहे. लाऊड स्पीकरवर बोलणे तुमचे काम नसल्याचे म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.