रांची – शुक्रवारी बिहार, झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत वरिष्ठ आयएएस आणि झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दोन डझन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या सनदी लेखापालकडून छाप्यादरम्यान 19 कोटी 31 लाखांची रोकड जप्त केली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून 150 कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त केली आहेत. पण, यासंदर्भात अधिकृत दुजोरा ईडीने अद्याप दिलेला नाही. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.
आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ईडीचा छापा; सीएच्या घरातून जप्त केले कोट्यावधीचे घबाड
पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांच्या बुटी हनुमाननगर येथील सोनाली अपार्टमेंटमधून जप्त करण्यात आलेल्या 19.31 कोटींहून अधिक रोख रकमेची माहिती ईडी सध्या गोळा करत आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीची कागदपत्रेही ईडीचे अधिकारी तपासत आहेत. केंद्र सरकारच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
ईडीची एकाचवेळी पाच राज्यांमध्ये छापेमारी
ईडीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सहा वाजता पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारीस सुरुवात केली. हे छापे रांची, मुंबई, दिल्ली आणि जयपूर येथे टाकण्यात आले. रांचीमधील छापे ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आले आहेत.
पूजा सिंघल यांचे रांची येथील अधिकृत निवासस्थान, कानके रोडवरील पंचवटी रेसिडेन्सीच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक १०४, सीए सुमन कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थान, पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर यांच्यावर ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. झा यांचे मुझफ्फरपूर, मिठनपुरा येथील निवासस्थान, पूजा सिंघल यांचा भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांच्या कोलकात्यात, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांच्या जयपूर येथील निवासस्थानासह एकूण दोन डझन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
खुंटी आणि चतरा येथील मनरेगा घोटाळ्यासंदर्भात २००० बॅचच्या आयएएस पूजा सिंघल यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2012 मध्ये कनिष्ठ अभियंता राम विनोद सिन्हा यांच्याविरुद्ध अवैध खाणकाम प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक हायप्रोफाईल नावे समोर आली. अवैध उत्खननातून मनी लाँड्रिंग होत असल्याची माहिती मिळाली होती. जेई राम विनोद सिन्हा यांच्याशी अनेक आयएएस अधिकारी आणि नेत्यांचे चांगले संबंध असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. ही माहिती समोर आल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने कारवाई केली आहे.