कोलंबो: श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली, जी मध्यरात्रीनंतर लागू झाली आहे. श्रीलंकेच्या डेली मिररने राष्ट्रपतींच्या मीडिया विभागाचा हवाला देत ही माहिती दिली आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर, आता श्रीलंकेतील पोलिसांना अधिकार मिळाला आहे की पोलीस आणि सुरक्षा दल कोणालाही मनमानीपणे अटक करू शकतात किंवा त्यांना हवे तेव्हा ताब्यात घेऊ शकतात.
श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी लागू, जोर धरु लागली राजपक्षे सरकारच्या राजीनाम्याची मागणी
जनतेने केली राजीनाम्याची मागणी
गेल्या अनेक आठवड्यांपासून श्रीलंकेतील जनतेकडून राष्ट्रपती आणि सरकारच्या राजीनाम्याची मागणी होत होती. दरम्यान, सरकारने आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. येथे सर्वसामान्यांसाठी खाण्यापिण्याची आणि दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तूंचाही तुटवडा आहे. राजपक्षे यांनी 1 एप्रिल रोजी आणीबाणी घोषित केली होती, जी 5 एप्रिल रोजी त्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलनानंतर मागे घेण्यात आली होती.
श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलेले राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी जनतेकडून सातत्याने होत आहे. याप्रकरणी कामगार संघटना शुक्रवारी देशव्यापी संपावर आहे. आरोग्य, टपाल, बंदर आणि इतर सरकारी सेवांमध्ये गुंतलेल्या बहुतांश कामगार संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. श्रीलंकेत सध्या व्यावसायिक क्षेत्र ठप्प आहेत.