पुणे – मशिदीवरील लाऊड स्पीकरवरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला बिघडू द्यायची नाही आणि जर कुणी तसा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई – अजित पवार
अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सगळ्याच जाती-धर्माच्या धार्मिक स्थळांचा आपल्याला आदर आहे. तिथे गेल्यावर आपण नतमस्तक होतो. ज्या गोष्टी त्यांच्या धर्मात सांगितल्या आहेत, त्या गोष्टी ते करत असतात. ही आपली चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे सध्या हे जे काही राज्यात सुरू आहे, ते थांबले पाहिजे. मला सर्वात जास्त काळजी ग्रामीण भागात जागरण गोंधळ, हरीनाम साप्ताह याची आहे. कारण असे कार्यक्रम रात्री उशिरा आयोजित केले जातात. गावातील लोक मजुरी काम करून घरी परतल्यानंतर जेवण वगैरे करून अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. पण लाऊड स्पीकरला विरोध केल्यामुळे अशा कार्यक्रमांवर देखील बंधणे येणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. जर कुणी कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा समर्थक आहे, हे आम्ही बघणार नाही. तो जर कायदा मोडत असेल, तर त्याकडे आम्ही डोळेझाक करणार नाही. कुणी कितीही अल्टीमेटम दिली, तरी आम्ही कोणाचेही ऐकून घेणार नाही. त्यामुळे ही बाब कार्यकर्त्यांनी देखील लक्षात घ्यायला हवी. बोलणारे नेते घरी बसतात, पण धरपकड अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होते. जे नियम आणि अटींचे पालन करुन लाऊड स्पीकरसाठी परवानगी घेतील, तेच फक्त लाऊड स्पीकर लावू शकणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान अजित पवार भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी म्हणाले की, यासंदर्भात संभाजी भिडे यांच्या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. पवार साहेब यांचीही काल चौकशी झाली. चौकशी आयोग आपले काम करत आहे. जोपर्यंत सर्व अभ्यास करून त्याचा अहवाल आयोग देत नाही, तोपर्यंत त्याबाबत काहीही बोलणे उचित नाही, असे मला वाटते. सगळे रिपोर्ट आयोगाकडे जात आहेत. बारकाईने तपास केल्यानंतर सर्वकाही कालांतराने पुढे येईल.
संभाजी भिडेंना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा पाठिंबा आहे. ते भिडेंच्या पाया पडतात का? यावर अजित पवार म्हणाले की, संभाजी भिडेंच्या पाया राष्ट्रवादीचा कोणताही नेता पडणार नाही, किंवा त्यांना पाठीशी घालणार नाही. जर कोणता नेता अशाप्रकारे पाठिंबा देत असेल, तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.