पाकिस्तान भारतात खलिस्तानी चळवळ वाढवण्याच्या तयारीत – रिपोर्ट


नवी दिल्ली – हरियाणाच्या करनालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) भारतात खलिस्तानी चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला होता. अटक करण्यात आलेले दहशतवादी तेलंगणात स्फोटके पोहोचवण्याच्या तयारीत होते. वृत्तानुसार, ही शस्त्रे पाकिस्तानमधून फिरोजपूरला ड्रोनद्वारे पाठवण्यात आली होती.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, मिळालेल्या गुप्तचर चिठ्ठीवरून असे समोर आले आहे की, आयएसआयला भारताच्या इतर भागांमध्ये खलिस्तान चळवळ वाढवायची आहे. नदीम अंजुमला भारतात अशांतता पसरवण्यासाठी शीख फुटीरतावाद्यांची मदत घ्यायची असल्याचे कळते. चिठ्ठीनुसार, अंजुमने लाहोरमधील रणजित सिंग नीता आणि वाधवा सिंग बब्बर यांच्यासह सर्व खलिस्तानी नेत्यांना भारतात शस्त्रे वितरित करण्यासाठी पंजाबमधील गुंडांना संघटित करण्यास सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, नोटमध्ये असे म्हटले आहे की, गुरुवारी करनालमध्ये पकडलेले चार लोक ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवणाऱ्या गटातील आहेत. गुप्तचर माहितीनुसार, ड्रोनद्वारे ही शस्त्रे पंजाबमध्ये पोहोचली होती आणि गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग ‘रिंडा’ याला देशाच्या विविध भागात पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे 2021 मध्ये लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातही रिंडा यांच्या नावाची एजन्सीने पुष्टी केली होती.

अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की गुंड त्याच्या स्थानिक नेटवर्कचा वापर करून पाकिस्तानमधून भारताच्या विविध भागात येणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवत होता. त्याने सांगितले की रिंडा लाहोरच्या जोहर शहरात वाधवा सिंगसोबत संपर्कात असण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी सांगितले की आयएसआयची अशी ईच्छा आहे कि वाधवा सिंग आणि रिंडा यांनी आरडीएक्सचा वापर करुन स्फोट घडवावे आणि अशांततेसाठी काही स्थानिक नेत्यांची हत्या घडवून आणवी, तसेच हिंदू-शीख आणि हिंदू-मुस्लिम तणाव वाढवण्याची संधी शोधावी.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करनाल येथून अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी गुरप्रीत याने एजन्सींना सांगितले की, रिंडाच्या सांगण्यावरून त्याला ड्रोनद्वारे सीमेपलीकडून माल मिळाला होता. सूत्रांनी माहिती दिली की तपासात आरोपींनी एजन्सींना सांगितले की त्यांनी एप्रिल 2022 मध्येही अशी खेप पाठवली होती. आरोपींनी पुढे सांगितले की, त्यांना माल मिळण्याच्या 6 तास आधी माहिती मिळत असे. या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शस्त्रे सापडल्यानंतर त्यांना विशिष्ट ठिकाणी किंवा राज्यात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.