केजरीवाल यांच्या टीका केल्याप्रकरणी भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक


नवी दिल्ली : दिल्ली भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली भाजप नेत्यांनी या अटकेला दुजोरा दिला असून त्यांच्यावर राजकीय विरोधकांना दडपल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर आणि हरीश खुराणा यांनी बग्गा यांच्या अटकेवरून राजकीय विरोधकांना आम आदमी पार्टीने (AAP) दडपल्याचा आरोप केला आहे. ‘आप’ सूडाच्या भावनेने काम करत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राजकीय निषेधाचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे मूळ आहे, पण केजरीवाल यांनी बग्गा यांना अटक करून लोकशाहीची हत्या केली आहे. कपूर म्हणाले की, तजिंदर बग्गा ही एक व्यक्ती नसून एक तत्व आहे, पक्ष नेहमीच बग्गा यांच्या पाठीशी उभा राहील. पंजाबमध्ये केजरीवाल यांनी केलेल्या सत्तेच्या गैरवापराचा भाजप तीव्र निषेध करतो.

खरं तर, काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’साठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केल्याबद्दल पंजाब पोलिसांनी आप नेत्याच्या तक्रारीनंतर बग्गा याच्याविरुद्ध चिथावणीखोर भाषण, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

यासोबतच पंजाब पोलिसांनी दिल्लीतील भाजपचे आणखी एक नेते आणि मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्याविरुद्धही एफआयआर नोंदवला आहे. याआधी पंजाब पोलिसांनी बग्गा आणि जिंदाल यांच्या अटकेसाठी या दोन नेत्यांच्या घरांवर छापे टाकले होते, मात्र त्यानंतर ते दोघेही त्यांच्या घरी सापडले नाहीत.