मुंबई : मुंबई लोकलमध्ये धावणाऱ्या एसी जनरल गाड्यांचे मूळ भाडे आज ५ मे पासून कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून त्यासाठी नवीन भाड्याची यादी जारी केली आहे. याशिवाय मुंबई लोकलच्या सामान्य गाड्यांच्या प्रथम श्रेणीचे मूळ भाडेही तर्कसंगत करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई लोकलमध्ये धावणाऱ्या सामान्य गाड्यांच्या एसी आणि फर्स्ट क्लास गाड्यांच्या सीझन तिकिटांच्या मूळ भाड्यात कोणताही बदल होणार नाही.
प्रवासीगण इकडे लक्ष द्या! आजपासून ५०% ने कमी झाले मुंबई एसी लोकल ट्रेनचे भाडे, पहा नवीन दर यादी
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीनंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतील वातानुकूलित लोकल गाड्यांचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली होती. दानवे म्हणाले होते की, सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून मी आणि आमच्या मंत्री अश्विनी जी (रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव) यांनी मुंबईतील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसी लोकल ट्रेनचे दैनंदिन सिंगल प्रवास भाडे ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर 2017 मध्ये पश्चिम रेल्वे मार्गांवर मुंबईत वातानुकूलित उपनगरीय लोकल सेवा प्रथम सुरू करण्यात आली. जानेवारी २०२० पासून मध्य रेल्वेच्या मार्गांवर एसी लोकल धावण्यास सुरुवात झाली. सध्या एसी लोकलचे सिंगल प्रवास भाडे 65 ते 240 रु. आहे.
- कल्याण – CSMT (53.21 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे रु. 100 आणि एसीचे भाडे रु. 105
- डोंबिवली – सीएसएमटी (48.06 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे ९५ रु.; एसीचे भाडे 105 रु.
- दिवा – CSMT (42.46 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे 90 रु.; एसीचे भाडे 100 रु.
- ठाणे – सीएसएमटी (33.02 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे रु 85; एसीचे भाडे 95 रु.
- मुलुंड – CSMT (30.56 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे: रु 85; एसीचे भाडे 95 रु.
- घाटकोपर – CSMT (19.30 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे: 60 रु.; एसीचे भाडे 70 रु.
- कुर्ला – CSMT (15.39 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे: 60 रु.; एसीचे भाडे 70 रु.
- दादर – CSMT (8.85 किमी): प्रथम श्रेणीचे भाडे: 25 रु.; एसीचे भाडे 35 रु.
- भायखळा – CSMT (4.04): प्रथम श्रेणीचे भाडे: २५ रु.; एसीचे भाडे 35 रु.