राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, भाजप खासदाराचे आव्हान; ठेवली ही अट


लखनौ : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचेही खासदार म्हणाले. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला आणि ते उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी ट्विट केले की, उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही ठाकरेंना भेटू नका, असा सल्ला देत लिहिले, राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे. ठाकरे कुटुंबीयांची भूमिका नाकारत आहे. राम मंदिर आंदोलनाबाबत ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

मनसे प्रमुखांनी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल योगी सरकारचे नुकतेच कौतुक केले असताना भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकर वादाला जन्म देणाऱ्या राज ठाकरे यांच्याशी भाजपची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, मनसे आणि राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यास भाजप कचरत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे. यूपी आणि बिहारचे लोक महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या नोकऱ्या हिसकावून गुन्हेगारी घटना घडवत असल्याचा आरोप राज ठाकरे वारंवार करत आहेत.