मुंबई : महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची गुरुवारी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या रुग्णालयात पोहोचले आहेत. कथित देशद्रोहाच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बुधवारी विशेष न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, दोघांचीही तुरुंगातून तातडीने सुटका होऊ शकली नाही. तत्पूर्वी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवनीत राणा यांना भायखळा कारागृहातून जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना पुन्हा कारागृहात आणण्यात आले.
जामिनावर सुटल्यानंतर खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल
राणा दाम्पत्याच्या घराबाहेर बीएमसीची नोटीस
दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पथकाने उपनगरातील खार येथील नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या घराची तपासणी केली, परंतु त्यांना अपार्टमेंट कुलूपबंद आढळले. पाहणी न करताच पथक परतले. राणा कुटुंबाचे लविभवनच्या आठव्या मजल्यावर एक अपार्टमेंट आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याठिकाणी अवैध बांधकामाची तक्रार होती. ते म्हणाले की, सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने दुपारी 12.30 च्या सुमारास इमारतीला भेट दिली. बेकायदा बांधकामाच्या तक्रारीवरून बीएमसीने 2 मे रोजी सोसायटी आणि आठव्या मजल्यावरील रहिवाशांना नोटीस बजावली होती.