लाऊडस्पीकर वाद : मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरूंचा मोठा निर्णय, सकाळची अजान होणार लाऊडस्पीकरशिवाय


मुंबई – लाऊडस्पीकर अजानवरून देशभरात वाद उफाळून आला आहे. विशेषतः महाराष्ट्रात या प्रकरणाने जोर पकडला आहे. एकीकडे या वादावरून राजकारणही शिगेला पोहोचले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मगुरूंनी लाऊडस्पीकरवरील अजानबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरूंनी मशिदींमध्ये सकाळी लाऊडस्पीकरवरून अजान दिला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मुस्लीमबहुल भागातील मोहम्मद अली रोड, मदनपुरा, नागपाडा यासह 26 मशिदींच्या धर्मगुरूंनी सुन्नी बादी मशिदीत झालेल्या बैठकीनंतर एकमताने हा मोठा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात घेतलेल्या निर्णयात धर्मगुरूंनी म्हटले आहे की, आता मशिदींमधील सकाळची अजान लाऊडस्पीकरवरून केली जाणार नाही. यासोबतच सर्व मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ना अजान, ना लाऊडस्पीकरचा वापर होणार

मनसे नेत्यांची धरपकड सुरूच
लाऊडस्पीकर अजानच्या वादावरून महाराष्ट्रात आता राजकारण शिगेला पोहोचले आहे. मंगळवारी ईदनिमित्त अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. मनसे नेते राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण सुरू असून दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांवर सातत्याने अटक आणि कारवाई सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.