गुजरात: जिग्नेश मेवाणी आणि रेश्मा पटेलला तीन महिन्यांची तुरुंगवास, 1000 दंडही


अहमदाबाद – जिग्नेश मेवाणी यांना महेसाणा कोर्टाने मोठा झटका दिला आहे. त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिग्नेश मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांनाही तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विनापरवानगी रॅली काढल्या प्रकरणी एकूण 12 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

जिग्नेश मेवाणी, रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना ज्या खटल्यात शिक्षा झाली आहे, तो खटला जवळपास पाच वर्षे जुना आहे. 2017 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य पदयात्रा काढली. ही रॅली विनापरवाना केल्याचा आरोप करण्यात आला. आता महेसाणा न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात दोषी ठरवले आहे.

आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार यांच्यावर मोर्चा काढून सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. रेश्मा पटेल या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. उना येथील दलित मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर 12 जुलै 2017 रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आझाडू कूच’ नावाने आंदोलन करण्यात आले.

सध्या जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना आसाम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी जिग्नेशला एका महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केली होती. नंतर मेवाणी यांना या प्रकरणातही जामीन मिळाला होता. सध्या आसाम सरकारने या जामीनाविरोधात गुवाहाटी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आता या प्रकरणावर 27 मे रोजी सुनावणी होणार आहे.

रेश्मा पटेल यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्या राष्ट्रवादीच्या आधी भाजपमध्ये होत्या. डिसेंबर 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा राजीनामा देताना भाजप आता फक्त मार्केटिंग कंपनी बनली आहे, असे म्हटले होते. रेश्मा पटेल या हार्दिक पटेलसोबत पाटीदार आंदोलनाचा भाग होत्या.