आजपासून मुंबईतील मशिदींसमोर राज ठाकरेंची हनुमान चालीसा, जाणून घ्या IPS का म्हणाले अटक होणार नाही


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज अटक होणार का? औरंगाबादमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मंगळवारी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, मशिदींवरुन लाऊडस्पीकर हटवण्याचा ठाकरेंचा अल्टिमेटमही आज संपत आहे. अशा परिस्थितीत आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा ठरणार आहे. मशिदींवरुन लाऊडस्पीकर न हटवल्यास त्यांचे कार्यकर्ते तिथे हनुमान चालीसाचे पठण करतील, अशी घोषणा मनसे प्रमुखांनी केली आहे. राज यांच्या या इशाऱ्यानंतर संपूर्ण पोलीस खाते अॅक्टिव्ह झाले आहे.

त्यामुळे आज राज ठाकरेंना अटक होणार का?
दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, या प्रकरणी राज ठाकरे यांना त्वरित अटक केली जाणार नाही. ते म्हणाले, या प्रकरणी आम्ही राज ठाकरे यांच्याविरुद्ध जामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून त्यांना तातडीने अटक करण्याची गरज नाही. राज ठाकरेंना अटक होणार की नाही हा राजकीय निर्णय असेल.

या कलमान्वये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
औरंगाबाद पोलिसांनी कलम 153 (हिंसा भडकवण्याच्या हेतूने प्रक्षोभक भाषण), भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 116 आणि 117, महाराष्ट्र पोलिस कायदा 135 (नियमांचे उल्लंघन) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जाणून घ्या राज्य सरकारची भूमिका
लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 2005 च्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. लाऊडस्पीकरसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

मनसे कार्यकर्ते आहेत ठाम
राज यांच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्तेही ठामपणे उभे राहिले आहेत. राज ठाकरे यांना अटक झाल्यास आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, असे पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मशिदींवरील लाऊड स्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या अल्टिमेटमचे मनसे कार्यकर्ते पालन करतील आणि या प्रकरणात कोणताही बदल झालेला नाही.

राज यांनी भाऊ उद्धव यांना करून दिली बाळासाहेब ठाकरेंची आठवण
राज ठाकरे म्हणाले, ‘मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सर्व लाऊड स्पीकर बंद करणे आवश्यक आहे. तुम्ही ते पाळणार आहात, की तुम्हाला सत्तेत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या धर्मनिरपेक्ष शरद पवारांच्या मागे जाणार आहात? महाराष्ट्रातील जनतेला सांगा काय होणार आहे? आता नाही तर कधीच नाही या नव्या घोषणा देऊन राज यांनी आपले आवाहन संपवले.

मुंबई पोलीस आयुक्तांनी सांभाळला मोर्चा
राज यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी आज सकाळी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

लाऊडस्पीकरच्या वादावर पोलीस सतर्क, ठाण्यात 350 अधिकाऱ्यांसह 7 हजार जवान तैनात
लाऊडस्पीकर आणि हनुमान चालीसा पठणाच्या संदर्भात ठाणे पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत. आयुक्तालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी यासाठी शहरात 350 अधिकाऱ्यांसह एकूण 7 हजार 850 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या वतीने 1404 जणांना नोटिसा पाठवून ताकीद देण्यात आली आहे. दोन समाजातील लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासन सोडणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या सुट्या रद्द
सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलीस आयुक्तालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 137 (1) (3) अन्वये बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी लोकांना विनाकारण एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त एसआरपीएफच्या 9 प्लाटून आणि 300 होमगार्ड देखील सेवेत दाखल झाले आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरे यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारलाच आव्हान दिले आहे.