झुकणार नाहीत राज ठाकरे : मुंबई, नाशिकसह अनेक शहरात अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा, मनसेचे अनेक नेते ताब्यात


मुंबई – लाऊड ​​स्पीकरचा वाद महाराष्ट्रात जोर पकडत आहे. बुधवारी सकाळी मुंबईतील चारकोप परिसरासह राज्यातील अनेक शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अजान दरम्यान लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आंदोलनाची हाक दिली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी नवी मुंबईतील मनसे अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसेने महाराष्ट्रातील मशिदींमध्ये लाऊडस्पीकर बंदीच्या मागणीसाठी 4 मेपासून आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, या आंदोलनामुळे तणाव पसरू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी मुंबई, नाशिकसह अनेक शहरांमध्ये अजानच्या वेळी हनुमान चालीसा वाजवण्यात आली. मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका उंच इमारतीवरून अजानच्या वेळी मनसेचा एक कार्यकर्ता हातात पक्षाचा झेंडा फडकावताना दिसत होता आणि लाऊडस्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण केले जात होते. दुसरीकडे, नवी मुंबईतील सानपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्या मनसेचे शहराध्यक्ष योगेश शेटे यांना ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये सात महिला कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
नाशिकमध्येही नमाजाच्या वेळी हनुमान चालिसा वाजवण्यात आली. याप्रकरणी सात महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वांद्रे, भिवंडी आणि नागपूर येथेही अजानच्या वेळी हनुमान चालीसा वाजवली गेल्याची नोंद आहे. पुणे आणि नागपूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंदूंना केले ताकद दाखवण्याचे आवाहन
दरम्यान, राज ठाकरे यांचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी सर्व नागरिकांना हिंदूची ताकद दाखवण्यास सांगितले. जर ते आता घडले नाही, तर ते कधीही होणार नाही. ठाकरे म्हणतात, मी तमाम हिंदूंना आवाहन करतो की, जर तुम्ही 4 मे रोजी लाऊडस्पीकरवरून अजान ऐकाल, तर त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून उत्तर द्या. तरच त्यांना या ध्वनिक्षेपकांच्या वेदना कळतील.

बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ शेअर करत साधला उद्धव यांच्यावर निशाणा
राज ठाकरे यांनी शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे राज्यात आपले सरकार आल्यास मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात, महाराष्ट्रात माझे सरकार आल्यावर आम्ही रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्म असा असावा की तो राष्ट्रहिताच्या आड येऊ नये. आमच्या हिंदूंनी काही चूक केली, तर मला सांगा, आम्ही उपाय शोधू, मशिदीवरुन लाऊडस्पीकर खाली येतील.

मंदिरांसाठी घ्यावी लागते लाऊडस्पीकरची परवानगी
राज ठाकरे यांनीही एक निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरसाठी नियम निश्चित केले आहेत. त्यांच्या मते हा आवाज 10 ते 55 डेसिबलच्या दरम्यान असावा. 10 डेसिबलची पातळी ही व्हिस्परच्या बरोबरीची असते, तर 55 डेसिबल ही आमच्या स्वयंपाकघरातील मिक्सरच्या आवाजा एवढी असते. मशिदींमध्ये लाऊड ​​स्पीकरला परवानगी आहे, परंतु मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास आम्हाला परवानगी घ्यावी लागते. रस्त्यावर नमाज अदा केल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

डायल 100 वर करा तक्रार
निवेदनात राज ठाकरेंनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हाही अजानच्या आवाजाने त्रास होईल, तेव्हा 100 डायल करा आणि तक्रार करा. तसेच लेखी तक्रारी करा. जेव्हा जेव्हा मोठ्याने अजान असेल, तेव्हा मोठ्याने हनुमान चालीसा वाजवा, तरच त्यांना त्याचा त्रास कळेल.

ठाकरे यांच्यावर आणला दबाव
महाराष्ट्र सरकारने राज ठाकरेंवर आंदोलन करू नये म्हणून अप्रत्यक्ष दबाव आणला. औरंगाबादमध्ये भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी 14 वर्षे जुन्या प्रकरणात सांगलीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाभोवती जवान तैनात केले आहेत. त्यांना ताब्यात घेतले जाण्याची भीती आहे.

महाराष्ट्रात करण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्था कडक
दुसरीकडे राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संजय पांडे स्वतः मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी डीजीपी रजनीश सेठ यांनी स्पष्टपणे सांगितले होते की कायदा आणि सुव्यवस्था आणि सौहार्द बिघडवू देणार नाही.