नवनीत राणा यांना जामीन मंजूर : तुरुंगातून बाहेर येणार अमरावतीच्या खासदार


मुंबई : हनुमान चालिसा वादावरून तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने वकील रिझवान मर्चंट न्यायालयात हजर होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जामिनाला विरोध केला होता. सरकारी वकील प्रदीप घरत हेही न्यायालयात होते. राणा दाम्पत्यावर देशद्रोह आणि दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचे गंभीर आरोप आहेत. नवनीत राणा अमरावतीचे अपक्ष खासदार आहेत. तर त्यांचे पती रवी राणा आमदार आहेत. न्यायालयाने राणा दाम्पत्याला अनेक अटींवर जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्य मीडियाशी बोलणार नाही, भविष्यात असा कोणताही गुन्हा करणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीपूर्वी खालावली नवनीत राणा यांची प्रकृती
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात प्रकृती खालावली आहे. त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. नवनीत राणा यांनी प्रकृती ढासळल्याची माहिती दिली होती. त्यांच्या मानेला स्पॉन्डिलायटिस झाल्याची तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

23 एप्रिल रोजी करण्यात आली होती अटक
नवनीत राणा आणि तिचा पती रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादातून दोघांना अटक करण्यात आली. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.