कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली: सक्रिय रुग्ण 20 हजारांच्या जवळ, तर कालच्या तुलनेत 25 टक्के जास्त रुग्ण, 31 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्यांची तसेच सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,205 रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत सुमारे 25 टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान 31 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, गेल्या 24 तासांत 2802 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील 19,509 पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे आगामी काळात समस्या निर्माण होऊ शकतात.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,23,920 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत गेल्या 24 तासांत 2,568 प्रकरणे आढळून आली असून 20 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे 40 टक्के नवीन प्रकरणे एकट्या राजधानी दिल्लीतून समोर आले आहेत.

दिल्लीत कोरोनाने पुन्हा घेतला वेग
गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1414 रुग्ण आढळले आहेत, जे मागील दिवसांच्या तुलनेत 31 टक्क्यांनी अधिक आहे. याच काळात एका रुग्णाचाही मृत्यू झाला. राजधानीत एकूण बाधितांची संख्या 18,87,050 झाली आहे. दिल्लीत मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 1076 प्रकरणे समोर आली आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे 182 नवीन रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 182 नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत येथे 100 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

तीन महिन्यांनंतर नोएडामध्ये मंगळवारी सर्वाधिक 170 केसेसची नोंद
नोएडामध्ये तीन महिन्यांनंतर मंगळवारी सर्वाधिक 170 लोकांमध्ये कोरोनाबाधितांची पुष्टी झाली. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी 233 प्रकरणे समोर आली होती. राज्य सरकारच्या अहवालानुसार 24 तासांत 130 लोक या आजारातून बरे झाले आहेत.

हरियाणामध्ये आजपासून देण्यात येणार मोफत बूस्टर डोस
हरियाणातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील 1.2 कोटी नागरिकांना कोविडविरोधी लसीचा मोफत बूस्टर डोस देण्याची मोहीम आजपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी पूर्ण केली आहे. 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती.