मुंबई : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला मुलाखतीसाठी धमकावणाऱ्या पत्रकार बोरिया मजुमदारवर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या प्रकरणी समितीने मजुमदार यांना दोषी ठरवले असून आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. साहाला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर, मजुमदार यांना या विषयावर त्याच्याशी बोलायचे होते, परंतु साहाने नकार दिल्यावर मजुमदार संतापले आणि त्यांनी कधीही मुलाखत न घेण्याची धमकी दिली.
बीसीसीआयची कारवाई: साहाला धमकावल्याप्रकरणी बोरिया मजुमदारवर बोर्डाने घातली दोन वर्षांची बंदी
मजुमदारांच्या बंदीनंतर आता काय?
1. बीसीसीआयचा समावेश असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामन्यादरम्यान मजुमदार मीडिया प्रतिनिधी म्हणून स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाहीत आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहू शकणार नाहीत.
2. बीसीसीआयमध्ये नाव नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही भारतीय खेळाडूची मुलाखत घेऊ शकणार नाही.
3. बोरिया मजुमदार BCCI किंवा त्याच्या संलग्न सदस्यांच्या क्रिकेट सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. याचा अर्थ त्यांना एनसीएसारख्या संस्थेत जाऊन कोणत्याही खेळाडूशी बोलण्याची परवानगीही दिली जाणार नाही.
काय आहे प्रकरण?
श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने 19 फेब्रुवारी रोजी केली होती. मात्र अनुभवी यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाला त्यात स्थान मिळाले नाही. यानंतर बोरिया मजुमदार यांनी साहा यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला आणि मुलाखतीची मागणी केली, ज्याला साहाने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना मजुमदार यांनी गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करून साहाने नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाले मजुमदार?
मजुमदार यांनी साहाला लिहिले, मला मुलाखत द्या, खूप छान होईल. तुम्हाला लोकशाहीवादी व्हायचे असेल, तर मी दबाव आणणार नाही. ते एक यष्टिरक्षक निवडतात, जो सर्वोत्तम आहे. तुम्ही 11 पत्रकार निवडू शकता. चला प्रयत्न करूया, काय? माझ्या मते हे योग्य नाही. तुम्हाला सर्वात जास्त मदत करू शकेल अशी एक निवडा. मजुमदार यांनी नंतर लिहिले, तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही. मला अपमान सहन होत नाही आणि मला ते लक्षात राहील. तुम्ही असे करायला नको होते.
बोरिया मजुमदार यांनी पुन्हा केली पोस्ट
या संभाषणाचे स्क्रीनशॉट साहाने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यानंतर क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी साहाला पाठिंबा देत बीसीसीआयकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. यादरम्यान साहा यांना धमकी देणारे पत्रकार बोरिया मजुमदार असल्याचे उघड झाले. साहा सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तो गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.