नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 च्या प्लेऑफबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या हंगामातील प्लेऑफ कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आयपीएल 2022 ची फायनल, जय शाह यांनी केली घोषणा
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, आयपीएल 2022 चे प्लेऑफ कोलकाता आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. मेगा फायनल 29 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाईल, जिथे क्वालिफायर 2 देखील होणार आहे. याशिवाय क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर 24-25 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहेत.
याशिवाय, पुण्यात होणाऱ्या महिला टी-20 चॅलेंजलाही यावर्षी पुन्हा सुरुवात होत असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. आधी ते लखनौमध्ये असेल अशी माहिती होती, मात्र आता त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 ते 26 मे या कालावधीत चालणार असून अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, जिथे एक लाखाहून अधिक लोक बसण्याची व्यवस्था आहे. आयपीएलचे साखळी सामने 22 मे पर्यंत खेळवले जाणार आहेत, त्यानंतर प्लेऑफ सुरू होतील.
यावेळी कोरोनामुळे संपूर्ण आयपीएलचे आयोजन मुंबई-पुण्यात करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या मैदानांवर प्लेऑफचे आयोजन केले जात आहे. यासाठी कोलकाता आणि अहमदाबादची निवड करण्यात आली आहे, जे देशातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. प्लेऑफसाठी बीसीसीआय नियम शिथिल करेल आणि 100 टक्के प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली जाईल, असे मानले जात आहे.