सोशल मीडिया: इंटरनेट सेन्सेशन किली पॉलवर चाकू हल्ला


सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली किली पॉल अनेकदा आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतो. बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांतील गाणी आणि संवादांवर बनवलेल्या त्याच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आलेला किली पॉल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, यावेळी चर्चेचा विषय त्याचा व्हिडिओ नसून त्याची इन्स्टाग्राम स्टोरी आहे. वास्तविक, किलीने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

याबाबत माहिती देताना किली पॉलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना लिहिले की, माझ्यावर ५ जणांनी हल्ला केला. यादरम्यान माझा बचाव करताना चाकूने माझ्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे मला 5 टाकेही पडले आहेत. त्यांनी मला लाठ्या-काठ्यानीही मारले. नंतर मी त्यांच्यापैकी दोघांवर हल्ला केला आणि ते सर्वजण पळून गेले.

त्याने पुढे लिहिले की, मी यादरम्यान जखमी झालो आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. तेही खूप भयावह होते. किली पुढे लिहितो की, लोक मला खाली आणण्याचा प्रयत्न करतात. पण देव मला नेहमी वर आणतो. माझ्यासाठी प्रार्थना करा. पण, किली पॉलच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वत:चा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो पूर्वीसारखाच छान दिसत आहे.

आपल्या डान्सिंग व्हिडीओजने जगभरात ओळख मिळवलेला किली पॉल हा टांझानियाचा रहिवासी आहे. त्याने त्याच्या बहिणीसोबत भारतीय चित्रपटांतील गाणी आणि संवादांवर इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यास सुरुवात केली होती. त्याचे हे रील्स व्हायरल झाले आणि तो इंटरनेट सेन्सेशन बनला. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याच्या नृत्याचे व्हिडिओ पाहून त्याचे कौतुक केले आहे.