प्रशांत किशोर यांचे ‘जन सुराज्य’: केली नव्या मोहिमेची घोषणा, बिहारमधून सुरूवात


नवी दिल्ली: देशातील प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी सोमवारी त्यांच्या नवीन ‘जन सुराज्य’ मोहिमेचे उद्घाटन केले. त्याची सुरुवात बिहारपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजकीय रणनीतीकाराने ते स्वतःचा कोणताही पक्ष काढणार आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि सर्वात जुन्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे मिशनमध्येच सोडून ते नवी राजकीय सुरुवात करतील, असे मानले जात आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून आपल्या नव्या मोहिमेची घोषणा केली. लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात मदत करण्याच्या माझ्या प्रयत्नात गेल्या 10 वर्षांत चढ-उतार आले आहेत, असे त्यांनी लिहिले आहे. आता मी एक नवीन अध्याय सुरु करणार आहे. आता वेळ आली आहे ‘रिअल मास्टर्स’कडे जाण्याची म्हणजेच लोकांचे प्रश्न आणि सार्वजनिक सुराज्याचा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घेण्याची, सुरुवात बिहारपासून होईल.