तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मेवाणींचा हल्लाबोल : PMOने रचला अटकेचा कट, 1 जूनला गुजरात बंदची हाक


अहमदाबाद – तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुजरात काँग्रेसचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पीएमओवर खळबळजनक आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाम पोलिसांनी केलेली त्यांची अटक हा सुनियोजित कट होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने हा कट रचला होता. मेवाणी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की, माझी अटक ही 56 इंच छातीच्या माणसाची भ्याड कृती आहे. या कारवाईमुळे गुजरातचा अभिमान दुबळा झाला आहे.

1 जूनला गुजरात बंदची हाक
जिग्नेश मेवाणी यांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. त्यांनी 1 जून रोजी गुजरात बंदची घोषणा केली. मेवाणी म्हणाले की, 22 परीक्षांचे पेपर फोडणाऱ्यांवर, मुंद्रा बंदरातील 1.75 लाख कोटी रुपयांची ड्रग्ज आणि उना येथील दलितांवर दाखल झालेले गुन्हे मागे न घेतल्यास 1 जून रोजी आपण रस्त्यावर उतरू.

नियमांच्या विरुद्ध होती माझी अटक
आसाम पोलिसांनी केलेली अटक नियमांच्या विरोधात असल्याचे मेवाणी म्हणाले. हा पूर्वनियोजित कट होता. हे एका आमदारासाठी प्रोटोकॉल आणि नियमांचे घोर उल्लंघन होते. ते म्हणाले, मला अटक करून 2500 किमी दूर आणण्यात आले, तर गुजरात विधानसभेच्या अध्यक्षांनाही याची माहिती देण्यात आली नाही. कथितरित्या, त्यांनी माझा लॅपटॉप, संगणक, फोन, सर्व काही जप्त केले. त्यांनी त्यात स्पाय सॉफ्टवेअर टाकले नसावे, अशी भीती वाटते.