कुमार विश्वास यांना मोठा दिलासा : उच्च न्यायालयाने दिली अटकेला स्थगिती


चंदीगड : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना कुमार विश्वास म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे, रोपरमध्ये 12 एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेली ही एफआयआर कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून करण्यात आली आहे.

कुमार विश्वास यांनी मुंबईत मुलाखत देताना त्यांच्याविरुद्ध रोपरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगितले होते. सोबतच या प्रकरणी कोणतीही घाईघाईने चौकशी न करता एफआयआर नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 12 एप्रिलला दाखल केलेल्या या एफआयआरची प्रत दहा दिवसांनंतर 22 एप्रिलला दुपारी 3 वाजता त्यांना देण्यात आली. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, हा एफआयआर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकारे नोंदवण्यात आलेला एफआयआर हा स्पष्टपणे राजकीय शत्रुत्वाचा परिणाम आहे.

पंजाब सरकारने कुमार विश्वास यांच्यासह केजरीवाल यांच्याशी संबंधित खटल्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांची नियुक्ती केली आहे. पंजाबच्या अॅडव्होकेट जनरलच्या संपूर्ण टीमची उपस्थिती असूनही, पंजाब सरकारने या खटल्यांच्या वकिलीसाठी वरिष्ठ अधिवक्ता पुनीत बालीची निवड केली आहे.