मुंबई : राज ठाकरेंनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हिंदू संघटनांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या नेत्यांची बैठक झाली. लाऊडस्पीकर, हनुमान चालिसा, अयोध्या दौरा, महाआरती आदी विषयांवर ही बैठक झाली आहे. राज ठाकरेंच्या अजेंड्याला पाठिंबा देत, बजरंग दल आणि विहिंपनेही 3 मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी महाआरतीत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मनसेला आधीच पाठिंबा दिला आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा, अयोध्येच्या महाआरतीतही होणार सहभागी, मनसेची विहिंप, बजरंग दलाची बैठक
अयोध्येतूनही येणार कार्यकर्ते
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासाठी अयोध्येतूनही कार्यकर्ते येणार असल्याचा दावा मनसेकडून केला जात आहे. राज ठाकरेंसोबतच 150 वाहनांचा ताफाही औरंगाबादकडे रवाना होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे तिथेही महाआरती करणार आहेत. या महाआरतीमध्ये सर्व हिंदू संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे.
दोन हजार वकिलांची फौज सज्ज
आगामी काळात होणारा राजकीय संघर्ष लक्षात घेऊन मनसेने सुमारे 2000 वकिलांची फौज तयार केली आहे. 3 तारखेच्या अल्टिमेटमनंतर मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना वकील पुरविण्यात येतील. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला अनेक संघटनांनी आपला निषेध नोंदवला आहे.
अमित ठाकरे यांनी घेतला तयारीचा आढावा
मनसे अध्यक्षापूर्वी त्यांचे पुत्र अमित ठाकरे औरंगाबादला पोहोचले आहेत. शहरात दाखल होताच त्यांनी जाहीर सभेच्या सर्व तयारीची माहिती घेतली. मनसे नेते बऱ्याच दिवसांपासून औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. अमित ठाकरे यांनी सर्व नेत्यांची भेट घेऊन जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी व्यवस्थित केल्याची चर्चा आहे. याशिवाय या सभेला किती लोक येणार आहेत? त्यांची आसनव्यवस्था आणि इतर तयारीचीही त्यांनी माहिती घेतली आहे. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत 200 तरुण विद्यार्थीही मनसेत दाखल होणार आहेत. औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरेंच्या सभेने अधिक बळ मिळणार आहे.