हनुमान चालिसा वाद : राणा दाम्पत्याच्या जामिनावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली, दिलासा देण्यास पोलिसांनी केला विरोध


मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी मुंबईत अटक करण्यात आलेल्या नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याच्या जामिनावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. मुंबईतील सत्र न्यायालयात आता त्यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर 30 एप्रिल रोजी दुपारी 2.45 वाजता सुनावणी होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी न्यायालयात जबाब नोंदवला आहे. यामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन देऊ नये, अशी विनंती करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जाला पोलिसांनी कडाडून विरोध केला आहे.

राणा दाम्पत्याने गेल्या शनिवारी म्हणजेच 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या वैयक्तिक निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना समर्थक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. राणा दाम्पत्यानेही मातोश्रीवर न जाण्याचे जाहीर केले, पण याच दरम्यान त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. शांतता बिघडवणे, दोन समुदायांमध्ये वैर पसरवणे आणि देशद्रोहाची कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.

उच्च न्यायालयाने फटकारले होते
अपक्ष खासदार नवनीत राणा यांना फटकारताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा अर्ज फेटाळून लावला होता. सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल नवनीत राणा यांना फटकारले होते. सार्वजनिक जीवन जगणाऱ्यांवर अधिक जबाबदारी असते, असे न्यायालयाने म्हटले होते.

यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेनंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नवनीत राणांना भायखळा महिला कारागृहात, तर रवी राणांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.