आसाम: पोलीस मारहाण प्रकरणी जिग्नेश मेवाणीला जामीन, उद्या तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता


गुवाहाटी : पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना यापूर्वी पाच दिवसांची कोठडी सुनावली होती.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी आसाममधून अटक करण्यात आलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसामच्या कोक्राझार न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. पण, जामीन मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, काँग्रेस समर्थित आमदार मेवाणी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेवाणी हे वडगामचे काँग्रेस आमदार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, गोडसे यांना देव मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सलोख्याचे आवाहन करावे. वरील ट्विटच्या संदर्भात, मेवाणी विरुद्ध IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) ट्विट आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.