रायगड – उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरवरून वाद सुरू आहे. या सगळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर मशिदीतील लाऊडस्पीकर काढायला कोणी आले, तर आपला पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असेही ते म्हणाले.
लाऊडस्पीकर वाद; रामदास आठवले म्हणाले, आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आंबेडकर संस्कार भवनाच्या उद्घाटन समारंभाला रामदास आठवले पोहोचले होते. येथे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मी नरेंद्र मोदींसोबत आहे, माझा पक्ष भाजपसोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. मी म्हणालो लाऊडस्पीकर काढण्याबद्दल बोलू नका. जर तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, तर तुम्ही लावू शकता. तुम्ही तुमच्या मंदिरात लाऊडस्पीकर लावू शकता. हनुमान चालिसाचे पठण करू शकता. पण नवे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.
लाऊडस्पीकरचा मुद्दा उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत
सध्या उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरचा मुद्दा गाजत आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींमधून 3 मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवावेत, असा अल्टिमेटम दिला आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर मनसे कार्यकर्ते राज्यभरातील मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील, असे ते म्हणाले होते.
एवढेच नाही तर धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे, असे राज ठाकरेंनी ट्विट केले होते, त्याचबरोबर राज ठाकरे दुर्दैवाने महाराष्ट्रात योगी नाहीत. पण येथे सगळेच त्रस्त असल्याचे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून हटवले लाऊडस्पीकर
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 21 हजार 963 लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवरून हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर 42332 धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. उत्तर प्रदे सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या मोहिमेसंदर्भात आतापर्यंत 29808 धर्मगुरूंशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.