आता राणा दाम्पत्याच्या मुलीने पालकांच्या सुटकेसाठी केले हनुमान चालिसाचे पठण


अमरावती – महाराष्ट्रातील हनुमान चालिसा वादाला आता भावुकतेची छटा आली आहे. तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आठ वर्षांची मुलगी आरोही राणा हिने तिच्या घरी हनुमान चालीसाचे पठण केले आणि तिच्या पालकांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आरोही म्हणाली की, माझ्या आई आणि वडिलांची लवकरच सुटका व्हावी, म्हणून मी प्रार्थना करत आहे.


उद्या होणार जामिनावर सुनावणी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या मुंबईतील तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबईच्या सत्र न्यायालयात २९ एप्रिल म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या वैयक्तिक निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना समर्थक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. राणा दाम्पत्यानेही मातोश्रीवर न जाण्याचे जाहीर केले, पण याच दरम्यान त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. शांतता बिघडवणे, दोन समुदायांमध्ये वैर पसरवणे आणि देशद्रोहाची कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.

अटकेदरम्यान नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून पोलिस ठाण्यात गैरवर्तन तसेच पिण्याचे पाणीही न दिल्याचा आणि शौचालयात जाऊ न दिल्याचा आरोप केला होता. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये नवनीत राणा पती रवी राणासोबत पोलीस ठाण्यात चहा पिताना दिसत होत्या.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांची अटक आणि खार पोलीस ठाण्यात झालेल्या अमानुष वागणुकीच्या आरोपांबाबत गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आहे. त्याचवेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राणा यांची तक्रार विशेषाधिकार आणि आचार समितीकडे चौकशीसाठी पाठवली आहे.