व्हायरल; कॉकपिटमध्ये पायलटने पेटवली सिगारेट, विमानातील ६६ जणांना गमवावा लागला जीव


जगभरातून विमान अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक वेळा लोकांना जीव गमवावा लागला, तर अनेक वेळा वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. असेच एक प्रकरण काही वर्षांपूर्वी इजिप्तला जाणारे विमान समुद्रात कोसळून ६६ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

वास्तविक, न्यूयॉर्क पोस्टने एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, या विमानाच्या क्रॅशचे मुख्य कारण म्हणजे पायलटने कॉकपिटमध्ये सिगारेट पेटवली होती. यानंतर आग संपूर्ण विमानात पसरली. हे विमान फ्रान्समधील पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरून कैरोला जात असताना हा सर्व प्रकार घडला. रिपोर्टनुसार ही घटना मे 2016 ची आहे. या अपघाताचे कारण त्यावेळी कळू शकले नव्हते.

हा दहशतवादी हल्ला असल्याचे अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले. त्यादरम्यान ते क्रॅश होऊन भूमध्य समुद्रात पडले. मृतांमध्ये एक ब्रिटीश, 12 फ्रेंच पर्यटक, 30 इजिप्शियन, दोन इराकी आणि कॅनेडियन अशा 66 लोकांचा समावेश आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी या घटनेनंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पण त्यावेळी काही विशिष्ट कारण समोर आले नाही.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या तपासणीत विमानाच्या आपत्कालीन मास्कमधून ऑक्सिजन गळती होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पायलटने सिगारेट पेटवताच उडणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये आग लागली. ही आग संपूर्ण विमानात पसरली आणि विमान लगेचच कोसळले आणि समुद्रात पडले.