तामिळनाडू: तंजावर मंदिरात उत्सवादरम्यान भीषण अपघात, विजेचा धक्का लागून मुलांसह 11 जणांचा मृत्यू


चेन्नई – तमिळनाडूच्या तंजावरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिरातून निघणाऱ्या रथयात्रेदरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे.

तंजावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कालीमेडू येथील अप्पर मंदिरात घडली. रथयात्रा मंदिरातून निघून गेल्यावर वळण घेण्याची वेळ आली, तेव्हा वर असलेल्या तारांच्या जाळ्यामुळे रथ पुढे नेता येत नव्हता. पण, रथ मागे नेताच हाय टेन्शन लाईनशी संपर्क आला आणि संपूर्ण रथात विद्युत प्रवाह पसरला. या घटनेत काही मुलांना जीवही गमवावा लागल्याची माहिती आहे.

या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तंजावर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या अपघाताच्या छायाचित्रांमध्ये रथ पूर्णपणे जळत असल्याचे दिसत आहे.