देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ, 2927 जणांना लागण, सक्रिय रुग्णांमध्येही वाढ


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोनाचे 2,927 नवीन रुग्ण आढळले आहेत. अहवालानुसार, या दरम्यान 32 लोकांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनामुळे देशातील मृतांचा आकडा आता 5,23,654 वर पोहोचला आहे.

त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 2,252 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि, सक्रिय प्रकरणांमध्ये देखील वाढ झाली आहे. सध्या कोरोनाचे 16,279 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 4,25,25,563 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत 4,30,65,496 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान हा सलग आठवा दिवस आहे, जेव्हा कोरोनाबाधितांची दोन हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात 19 एप्रिल 2067, 20 एप्रिल 2380, 21 एप्रिल 2451, 22 एप्रिल 2527, 23 एप्रिल 2593, 24 एप्रिल 2541 आणि 25 एप्रिल रोजी 2,483 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की काल भारतात कोरोनासाठी 5,05,065 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. कालपर्यंत एकूण 83,59,74,079 नमुन्याच्या चाचण्या झाल्या आहेत.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी आज कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. पीएमओने सांगितले की, ही बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरणाचा विस्तार, बूस्टर डोस आणि काही राज्यांमधील कोरोनाची प्रकरणे यावर सादरीकरण करतील.