गोष्ट कामाची : एटीएममधून बाहेर पडल्या फाटलेल्या नोटा, मग जाणून घ्या काय आहे बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया, चुटकीसरशी होईल काम


नवी दिल्ली – आपण थोडा काळ मागे गेलो, तर आपल्याला आठवेल की आपल्याला स्वतःच्या पैशासाठी बँकेत लांबच्या लांब रांगेत उभे राहावे लागत होते. त्यातही कधी सर्व्हरची अडचण, कधी बँकेला सुट्ट्या. म्हणजे पैसे काढण्यासाठी त्या काळी खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता तसे नाही कारण आता बँकिंग क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आता तुम्ही बँकेशी संबंधित जवळपास सर्व कामे ऑनलाइन करू शकता. बँक खाते उघडणे, केवायसी करणे, एखाद्याला पैसे पाठवणे ही सर्व कामे तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे करु शकता.

तर आता प्रत्येक रस्त्यावर-चौकात पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन आहे. पण अनेकवेळा अनेकांसोबत असे झालेले दिसून येते की जेव्हा ते एटीएममधून पैसे काढतात तेव्हा त्यांना फाटलेल्या नोटा मिळतात. अशा परिस्थितीत ते अस्वस्थ होतात आणि त्यांना समजत नाही की आता या नोटांचे काय होईल? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या फाटलेल्या नोटांच्या जागी तुम्हाला योग्य नोटा कशा मिळतील.

याबाबत आहेत आरबीआयचे नियम
RBI ने बँकिंग क्षेत्रासाठी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैकी एक फाटलेल्या नोटांसाठी देखील आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून फाटलेल्या नोटा तुम्हाला बँकेत घेऊन जाव्या लागतील आणि बँक त्या बदलण्यास नकार देऊ शकत नाही.

फाटलेल्या नोटा एटीएममधून अशा प्रकारे बदलता येतील:-

  1. ज्या एटीएममधून तुमच्या फाटलेल्या नोटा काढण्यात आल्या आहेत, तुम्हाला त्या एटीएमशी जोडलेल्या बँकेत जावे लागेल. येथे तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे कुठून काढले, किती, वेळ इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  2. या अर्जासोबत तुम्हाला एटीएममधून काढलेली स्लिपही द्यावी लागेल. तुमच्याकडे एटीएम स्लिप नसेल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये आलेल्या व्यवहाराची माहिती द्यावी लागेल.
  3. बँकेला अर्ज आणि इतर सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर बँक तुमच्या फाटलेल्या नोटा घेऊन तुम्हाला योग्य नोटा देईल.

हे देखील जाणून घ्या
एका वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात याबद्दल सांगायचे झाले, तर आरबीआयचे नियम सांगतात की एका व्यक्तीला बँकेतून एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलून मिळू शकतात. त्याचबरोबर या नोटांचे मूल्य ५ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.