आमदार जिग्नेश मेवाणी यांचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी


गुवाहाटी: गुजरातचे काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. जिग्नेश मेवाणीचे वकील अॅडव्होकेट अंगशुमन बोरा यांनी सांगितले की बारपेटा पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना त्यांच्या ट्विटशी संबंधित प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर, त्यांना आणखी एका प्रकरणात पुन्हा अटक केली होती.

जाणून घ्या काय आहे प्रकरण
काँग्रेस समर्थित आणि उत्तर गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी 20 एप्रिल रोजी पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली होती. आसाममध्ये त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिग्नेश मेवाणी यांनी देशातील हिंसक घटनांबाबत एक ट्विट केले होते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नथुराम गोडसेच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात, त्यामुळे ते देशात शांतता राखण्याचे आवाहन करणार नसल्याचे लिहिले होते.

या ट्विटमुळे संतापलेल्या मोदी समर्थकाच्या वतीने जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात आसाममध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अहमदाबाद ते दिल्ली आणि दिल्ली ते आसाम येथे ट्रान्झिट रिमांडवर नेण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर त्यांना अन्य एका प्रकरणात अटक करण्यात आली.