लाऊडस्पीकरचा वाद : राज ठाकरेंची सभा फेल! 9 मेपर्यंत औरंगाबादमध्ये कलम 144 लागू


औरंगाबाद – महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये CrPC कलम 144 लागू करण्यात आले आहे. नव्या आदेशानंतर जिल्ह्यात 9 मेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रॅलीची घोषणा होताच पोलिसांनी निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांची औरंगाबाद जिल्ह्यात 1 मे रोजी सभा होणार होती.

मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी केली आहे. लाऊडस्पीकरवरून अजानला विरोध करण्यासाठी ते 1 मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सभा घेणार होते. तसेच मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. तसे न झाल्यास लाऊडस्पीकरवरच हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असे ते म्हणाले होते.

मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत ठाकरे म्हणाले होते, मशिदींमध्ये एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवले जातात? हे थांबवले नाही, तर मशिदीबाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल.

राज्यात लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले होते की, धर्म हा कायदा आणि देशाच्या वर नाही, हे मुस्लिमांनी समजून घेतले पाहिजे. आम्हाला महाराष्ट्रात दंगली नको आहेत. कोणीही प्रार्थना करण्यास विरोध केला नाही. मशिदी आणि देशभरात बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर काढून टाकावेत, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले होते.

ते पुढे म्हणाले, तुम्ही लाऊडस्पीकरवर अजान करणार असाल, तर आम्हीही देखील हनुमान चालीसासाठी लाऊडस्पीकर वापरू. कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही, हे मुस्लिमांनी समजून घेतले पाहिजे. 3 मे नंतर बघेन काय करायचे ते. मनसे अध्यक्षांच्या घोषणेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आरोप केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, त्यांचे भाषण भाजपने प्रायोजित केले होते.