वीज खंडित झाल्याने संतापली धोनीची पत्नी, ट्विट करून सरकारवर सोडले टीकास्त्र


रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी सध्या झारखंडमध्ये वीज खंडित झाल्यामुळे हैराण आहे. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत तिने अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारवर सडकून टीका केली आहे. धोनीच्या पत्नीने ट्विट करून लिहिले की, एक करदाता म्हणून फक्त हे जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये एवढी वर्षे वीज संकट का आहे? आम्ही जाणीवपूर्वक खात्री करत आहोत की आम्ही उर्जेची बचत करतो. आपल्या माहितीसाठी धोनीची पत्नी ट्विटरवर क्वचितच सक्रिय असते. यापूर्वी तिने शेवटचे ट्विट 16 जुलै 2021 रोजी केले होते.

लोडशेडिंगमुळे झारखंडमधील जनता त्रस्त
झारखंडमधील लोक सततच्या लोडशेडिंगमुळे हैराण झाले आहेत, कारण राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. पश्चिम सिंगभूम, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. तर रांची, बोकारो, पूर्व सिंगभूम, गढवा, पलामू आणि चतरा येथे २८ एप्रिलपर्यंत खूप उष्ण राहण्याची शक्यता आहे.

वीज संकटावर सुरूच आहे बैठकांचा फेरा
सोमवारी तत्पूर्वी, ऊर्जा मंत्री आरके सिंह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वीज प्रकल्पांना कोळशाच्या कमी पुरवठ्यामुळे वाढत्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणांवर चर्चा केली. यादरम्यान विजेच्या मागणीला सामोरे जाण्यासाठी धोरण आखण्यात आले.