रशियासाठी आव्हान : हे दोन देश लवकरच NATO मध्ये होऊ शकतात सामील


वॉशिंग्टन – स्वीडन आणि फिनलंडने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आघाडीच्या सदस्यत्वासाठी तयारी पूर्ण केली आहे. दोन्ही देशांनी मे महिन्याच्या मध्यापर्यंत अर्ज सादर करण्याचे मान्य केले आहे. अर्ज मंजूर झाल्यास हे दोन देश लवकरच त्याचे सदस्य होतील. हे दोन्ही देश युक्रेन संकटाच्या वेळी रशियाच्या हुकूमशाहीला विरोध करत आहेत. या दोन देशांना नाटोचे सदस्यत्व मिळाल्यास साहजिकच ते रशियासाठी आव्हान ठरू शकतात. पण, रशियानेही या दोन्ही देशांना नाटोमध्ये सामील न होण्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वीच रशियाने दिला आहे इशारा
दरम्यान द्विपक्षीय राजनैतिक माध्यमांद्वारे रशियाने स्वीडन आणि फिनलंडला नाटोमध्ये सामील होण्याच्या परिणामांबद्दल वारंवार चेतावणी दिली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देश सदस्यासाठी पावले उचलत असतील, तर आगामी काळात मोठे युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे रशियाने या दोन देशांना इशारा दिला होता की, फिनलंड किंवा स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास रशिया बाल्टिक देश आणि स्कॅन्डिनेव्हियाजवळ अण्वस्त्रे तैनात करेल.

रशियाशी आहे फिनलंडची 1300 किमीची सीमा
फिनलंडची रशियाशी 1300 किमीची सीमा आहे. फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनीही रशियाचे आव्हान स्वीकारले असून, त्यांचा देश येत्या काही आठवड्यांत नाटोमध्ये सामील होण्याबाबत निर्णय घेईल.

जाणून घ्या नाटो म्हणजे काय, सध्या ३० देश आहेत त्याचे सदस्य
रशिया आणि युक्रेन वादात सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचे नाव नाटो आहे. NATO ची निर्मिती 1949 मध्ये झाली. त्याचे सदस्यत्व एकूण 30 देशांनी घेतले आहे. फिनलंड आणि स्वीडन यांनाही सदस्यत्व मिळाल्यास एकूण सदस्य देशांची संख्या ३२ होईल. अमेरिका यासाठी सर्वाधिक निधी देते. NATO म्हणजे (North Atlantic Treaty Organization).